आम्ही आहोत ‘संगवारी’
सरते शेवटी आम्ही – मी,आमचं बाळ आणि माझा आयुष्यभराचा संगवारी, माझा नवरा- जीतू, छत्तीसगढमधील सरगुजा जिल्ह्यात नुकतेच काम सुरु केलेल्या‘संगवारी’ या संस्थेत पोहोचलो! अर्थातच आम्हाला सर्व घरच्यांच्या, मित्रमंडळींच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आणि जवळच्या माणसांच्या काळजीचे निराकरण करण्यात काही अंशी यश आले, आणि तेही अल्पकाळात!
त्याचं झालं असं की, जीतूने आणि मी“संगवारी” संस्थेत काम करण्याचे ठरविले; त्याकरिता आमचा इंटरव्ह्यू सुद्धा झाला. पण, जेव्हा घरच्यांना आणि मित्रांना हे कळलं तेव्हा, त्यांना आश्चर्य आणि काळजी दोन्ही वाटायला लागली. कारण, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी आमची नाळ अगदी जन्मतःच जूळलेली आहे. तसेच, या आधी आम्ही गडचिरोली सारख्या आदिवासी-बहुल ग्रामीणभागात जरी काम करीत असलो तरि तो भाग आमच्या गावापासून अगदी जवळ होता.
कोरोनाच्या काळात लॉकडाउन असताना घरापासून खुप दूर अगदी वेगळ्या राज्यात- छत्तीसगढ मधे; सोबत ४ महिन्यांचं छोटं बाळ असतांना पाठवणे, हे घरच्यांना मान्य असणं तसं कठिणच! पण “संगवारी”तील शिल्पा ताई आणि चैतन्य दादां सोबत आमची पहिल्यापासून ओळख असल्यामुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला हे शक्य झाले. आणि म्हणूनच सध्याच लावलेल्या बीजाचे अंकुरात होणारे रूपांतर अगदी जवळून पहायला मिळत आहे.
आरोग्याची परिस्थिति गंभीर झाल्यावर लोकांनी आपल्यापर्यंत येऊन इलाज करवून घेण्याची वाट बघत बसण्यापेक्षा, आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं;त्यांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात; आवश्यक असणार्या आरोग्य-सेवा, आरोग्याशी संबंधित अन्य सुविधा त्यांना परवडतील अशा दरात सहजतेने उपलब्ध व्हाव्यात आणि यासाठी आपण ठोस रचनात्मक कृती करायला हवी आणि तेही त्यांचा सोबती बनून; या भावनेने आणि विचारांनी एकत्र येऊन काही मित्रांनी “संगवारी” म्हणजेच सोबती, साथीदार ही संकल्पना अंमलात आणली.
आमच्या बारा लोकांच्या टिमने अवघ्या आठ-नऊ महिन्यांच्या काळात कोविड सारख्या आपत्तीजनक परिस्थितीत कमीत कमी संसाधनांमध्ये स्वतःचे 100% देऊन अनेक प्रकारची कामं केली आणि हीच गोष्ट मला लिहायला प्रवृत्त करणारी ठरली. त्यातली काही काम अशी—
1) Medical College COVID-ICU Project:- कोविड काळात शासनाला डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा जाणवला होता; हा तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न,या प्रोजेक्टमध्ये केला गेला. हा कार्यक्रम संगवारीने Doctors-For-You_DFY नावाच्या संस्थेसोबत चालवला. हया कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण 3 महिन्यांसाठी _१५ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान अंबिकपुर मेडीकल कॉलेज मधलं २० खाटांचं I.C.U. म्हणजेच अति-दक्षता-विभाग दत्तक घेतला. तेथे 8 डॉक्टरस् व १६ नर्सेस उपलब्ध करून दिल्या.हयासोबतच संगवारीतील३ सीनियर डॉक्टरस् २४ तास शिफ्टनुसार ICU मध्येसदैव उपलब्ध होते; तसेच कॉलेजच्या डॉक्टरस् आणि नर्सेचं COVID संदर्भात प्रशिक्षणसुद्धा घेतले. या कालावधित त्यांनी 96 रुग्णांना ICU मधे आरोग्य सेवा पुरविली.
2)Community Clinic/ गावस्तारिय सामुदायिक दवाखाना:- ह्या कार्यक्रमाची सुरुवात लखनपुर तालुक्यातील ‘बिनिया’ गावापासून झाली. दर आठवड्यातील शुक्रवारी- ज्या दिवशी ह्या गावाचा आठवडी बाजारही भरतो, तिथे आमची टिम आरोग्यसेवा घेउन जाते. गावांमधील प्रत्येक आजाराची प्राथमिक चिकित्सा करून परवडणाऱ्या दरात औषधं, रक्त चाचण्या, इ. आरोग्य सुविधा पुरवते. सध्या लखनपुर मधील बिनिया आणि मैनपाट तालुक्यातील कुनिया नावाच्या गावात आमचं कम्यूनिटी क्लिनिक सुरू झालं आहे. त्याशिवाय आम्ही लखनपुर-उदयपुर तालुक्यांतील पर्वतीय भागामधे असलेल्या, दळण-वळणास कठिण भागांमधेही महिन्यातून एक दिवस दूरदराज दवाखानाही घेउन जातो. कारण इथे जवळपास १० ते १५ किमीच्या अंतरावर असलेल्या अनेक गावांतील लोकांना आरोग्य सुविधा साहजिकपणे मिळत नाहीत व प्राथमिक सुविधा सुद्धा मिळत नाहीत. अशावेळेस ह्या दूरदराज दवाखान्यामार्फत गावकऱ्यांना आरोग्यसुविधा आणि आरोग्यशिक्षणसुद्धा दिले जाते.
3) Community Program / गाव-स्तरिय-कार्यक्रम:- या कार्यक्रमाद्वारे, आरोग्याची घरोघरी आणि गावा-गावांमध्ये काय स्थिति आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या करिता गावांत जाऊन गटचर्चा करणे, गरजेनुसार वेगवेगळे सर्वे करणे,गावातील आजारी आणि सुद्रुढ व्यक्तींचीही चौकशी करणे, त्यांना आरोग्याच्या काय काय समस्या जाणवतात हे समजून घेणे, आजारी पडल्यावार गावातील लोक कुठे जातात, कोणाकडून इलाज करुन घेतात हे समजणे, गावामधली आशाताई- मितानिन-दीदी कोण आहेत, त्यांना आरोग्यसेवा पुरवायला काय अडचणी जातात हे समजुन घेणे; तसेच गावांमध्ये आगोदर पासून कार्यरत असलेल्या संस्थांची किंवा ग्रुपची मदत घेउन काही आरोग्य विषयक कार्यक्रम राबवणे, इ. मोघम कामं सध्याचालू आहेत.
या सर्वांतून निघालेल्या माहितीच्या आधारे पुढच्या कामाची दिशा, वाटचाल काय असेल ते ठरवणे, तसेच आरोग्याची काय काय सामजिक कारणं आहेत व त्याची उत्तरं गावाकऱ्यांसोबत चर्चाकरुन, एकत्र येउन शोधणे, आणि मग हया उत्तरांची अम्मलबजावणी करणे, अशा सर्व कामांची योजना आम्ही “गाव-स्तरिय-कार्यक्रमां”मधे आम्ही आखत आहोत.
4) Pain and Palliative care :– या कार्यक्रमात ‘वेदना व दुर्धर आजारांची सेवा’ संदर्भात अंबिकापुर इथल्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून तीन दिवसव होलीक्रोस होस्पिटल मधेआठवड्यातून एक दिवस, डॉ. शिल्पा खन्ना यांच्या मार्फत इलाज व तपासणी केली जाते.एखादा आजार पुर्णपणे ठीक न होणारा – terminal illness असेल किंवा लवकर ठीक न होणारा आजार असेल, अशा आजारांत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळावा म्हणून हे क्लिनिक असते. यामध्ये नेहमीच्या वेदानाशमक औषधांसोबतच काही वेदनाशमक प्रक्रिया, शस्त्रक्रिया तसेच फिजिओथेरपीसुद्धा दिली जाते.
5) Administration And Finance:- वरिल सर्व कार्यक्रम सुरळीत चालावेत यासाठी लागतं ते नियोजन आणि व्यवस्थापन!हे काम करण्यासाठीचं छोटसं प्रशाकिय खातं आमच्याकडे आहे आणि त्याचाच एक भाग मी आहे. कामासाठी लागणारा फंड जमा करणे, त्याचा लेखा जोखा ठेवणे; त्या फंडचा सुयोग्य वापर सरगुजाच्या लोकांचे आरोग्य सुधारणे साठीच व्हावा, हे निरखून पाहण्याचं काम आमची टिम करते. क्लिनिकमधील औषधांसाठी, चाचण्यांसाठी लागणारा खर्च, ट्रेनिंग मटेरियल बनविण्यासाठी व ट्रेनिंग घेण्यासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा, क्लिनिक साठी लागणारा वाहतुकीचा आणि इतर खर्च, तसेच कर्मचार्यांचे मानधन हे ह्या फंडमधून दिले जातात.
याआधी मी साडे-चार वर्ष मुख्यतःगावा-गावांत जाउन- फील्डवर राहून काम केलं होतं पण प्रशासकिय विभागाचा एक भाग म्हणून जबाबदारी पार पाडण्याची ही माझी पहिलीच वेळ! आणि हा सध्याचा अनुभव छान आहे. मी माझ्या बाळालासांभाळून हे काम करू शकत आहे.मीसुद्धा नेहमीच गावात- फील्डवर जायला खूप उत्सुक असते. कारण इथल्या लोकांविषयी, गावांविषयी, चालीरितींविषयी, निसर्गाविषयी मी आमच्या टिम कडून ऐकत असते, हे प्रत्यक्षात पाहण्याची, त्यांच्यासोबत जवळीक साधण्याची आणि आपुलकीचं नातं निर्माण करण्याची माझी इच्छा आहे.
माझ्या गावकडचं खेडं,गडचिरोलीतल्या आदिवासी गावातील ‘टोला’ आणि इथला ‘पारा’ यामधलं साम्य आणि फरक मला स्वतःहून पहायचा आहे, अनुभवायचा आहे आणि संगवारी नावाच्या अंकुराचे रोपट्यात व पुढे मोठ्या झाडात झालेले रूपांतर पहायचे आहे.
– सरिता लोगडे
सरिता किती सुंदर लिहिलंय. Really proud of you
Very great work of sangwari and all team, it is very beneficial for poor people who can’t go to modern and high price hospital. So best of luck and go ahed to all team
Well done ! Keep it up. God Bless you and your family.