Ghaton Yatra

Ghaton Yatra

क्लिनिक ची फार्मसी

मी मूळचा महाराष्ट्रातील असलो, तरी माझे गाव छत्तीसगढ व मध्यप्रदेश सीमेलगतचा गोंदिया जिल्हातलं! शालेय शिक्षण घेत असतांनीच कुटुंबासोबत गावापासून दूर अंतरावर राहिलो. त्यादरम्यान 2010 पासून गडचिरोली सारख्या जिल्ह्यात राहायला लागलो आणि 2012 पासून कामाची सुद्धा तिथेच सुरुवात केली. जवळपास 9 वर्षे आदिवासी गावात केलेलं काम अविस्मरणीय होतं. परंतु आता मी एका नव्याने सुरुवात झालेल्या परंतु सामाजिक भान जपून असलेल्या टिम ‘संगवारी’ सोबत नविन सुरुवात केली आहे. मला संस्थेच्या कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळाल्याचा विशेष आनंद झाला, त्याची कारणेही तुमच्या वाचनात येतील, माझ्या अनुभवाच्या स्वरुपात!

घराजवळचं दीडशे किलोमीटर अंतरावरील काम सोडून, पाचशे किलोमीटराहून अधिक अंतरावर असलेल्या अम्बिकापुर येथे काम करण्याचा माझा निर्णय माझ्या घरच्यांनी जड अंतःकरणाने स्वीकारला, त्यातून आमचं चार महिन्याचं बाळ सोबत आणि कोरोनाचे संकट सर्वत्र! मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. आणि आता, आम्ही गडचिरोलीतं काम सोडून छत्तीसगडमधील सरगुजा जिल्हातल्या “संगवारी” या संस्थेत रुजू झालो आहोत. छत्तीसगडच्या उत्तर दिशेला असलेला हा जिल्हा मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड आणि ओडिशा या राज्यांच्या सीमेलगत आहे. येथील 90% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते, त्यात सुद्धा आदिवासी समुदाय अधिक! आणि ग्रामीण भागातील आरोग्य  सेवेबद्दल नव्याने सांगायची गरज नाही. सध्या प्रत्येक शुक्रवारी, बाजाराच्या दिवशी, बिनिया नावाच्या गावात एक स्वास्थ्य केंद्र – क्लिनिक सुरू केले आहे. अजूनही काही नविन ठिकाणी क्लिनिक्स सुरू करणार आहोत.

घाटोन चा मार्ग

मी इथे येऊन काही आठवडे झाल्यानंतरची गोष्ट आहे. मी मुख्यतः क्लिनिक दरम्यान औषधी वितरण करणे, चांगल्या आरोग्यसाठी समुपदेशन देणे, त्याच बरोबर ऑफिस सम्बंधित आर्थिक कामे आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे, अशा सर्व कामांमधे मग्न असतो. औषधी वाटप करतांनी वारंवार माहिती मिळाय़ची की, काही लोक पहाडावरून आलेत; ते ऐकून मला नवल वाटायचे की अक्खच्या अक्खं गाव पहाडावर कसं काय असू शकतं? एवढे म्हतारे लोक कसं काय इतक्या दूर तपासायला येणार? त्यागावात जर दीर्घकाळ चालणारे आजार, जसं की बी.पी., डायबेटीस, इ. असणारे रुग्ण असतील, तर त्यांच्या औषधांचा पाठपुरावा कसा करणार? असे अनेक प्रश्न मनात होते. ते जाणूनही घ्यायचे होते.

आणि काही दिवसांतच आमच्या टीमच्या उद्दीष्टयानुसार काही रुग्णांचा पाठपुरावा करण्यासाठी, तसेच गावकर्‍यांसोबत चर्चा  करून आरोग्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी एका गावाला भेट द्यायचे ठरले. या वेळेस भेटीसाठी घटोंन या गावाची निवड केली. ह्या गावाच्या समस्या जरा वेगळ्या होत्या; त्या गावापासून दूर 2 किमी अंतरापर्यंतच चारचाकी वाहने पोहोचू शकतात, त्यातच डोंगर असल्याने पायवाटा आहेत आणि डोंगराच्या टोकावर गाव वसलेलं आहे, जिथे पोहाचायलाच आम्हाला दोन ते अडीच तास लागले. त्यानंतर क्लिनिक मध्ये येणाऱ्या त्यागावातील प्रत्येक रुग्णाबद्दल माझ्या मनात एक वेगळे स्थान तयार झाले आहे. अजून काही गोष्टि कळल्या, की त्या डोंगरात हत्ती फार आहेत व ते गावात घुसून कधी-कधी नासधूस करतात; तेव्हा लोकं एकत्र येऊन सुरक्षित ठिकाणी म्हणजे पक्कं बांधकाम असलेल्या गावातील शाळेत येउन राहतात.

हत्तींपासून बचाव करण्यासाठी गावात लिहिलेल्या सुचना

गंभीर आजारांसाठी जे चालू शकत नाहीत, तसेच सर्पदंश झालेले आणि गरोदर माता ज्यांना दवाखान्यात नेणे फार गरजेचे असते, अशाच गरजूंना त्या गावंची लोकं खाटेवरबांधून खाली आणतात आणि नंतर त्यांची वाहनाची व्यवस्था होते. ह्या सर्व बाबी करत असतांनी, रुग्ण दगावतो सुदधा! म्हणून इथे बऱ्याचदा बाळंतपण सुद्धा घरीच करावी लागतात. तात्काळ अडचण आल्यास खाटेचा प्रवास  करावा लगतो आणि काही वेळा बाळंतपण रस्त्यातसुद्धा झाली आहेत, अस गावची लोकं सांगत होती. त्यागावची लोकं आठवड्यातून १ ते २ वेळा खाली येतात. त्यात मुख्यत: शुक्रवार हा बाजाराचा दिवस, तसेच आमच्या क्लिनिकचाही! त्यामुळे बाजाराच्या निमित्ताने का होईना, ते तपासणी करायला आपच्याकडे येतात, तेव्हा समाधान वाटतं की त्यांना आरोग्याची थोडी फार मदत करण्याचा प्रयत्न आपण करतोय. भविष्यात नक्कीच आम्ही अश्या गावातील अधिक गरजूंना अखंडित आरोग्य सेवा मिळावी, याचा प्रयत्न करु.

तसेच सध्याची गरज ओळखून संगवारी टिमने कोविड-19 सम्बंधित गावपातळीवर काम सुरु केले आहे. त्यात २६ गावातील होम आइसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची गंभीर लक्षणे ओळखून, ऑक्सिजनची मात्रा पडताळून, गावातल्या गावात योग्य सल्ला कोविड साथी – गावातील निवडलेला प्रशिक्षणार्थी देतात. कोविड साथींना प्रशिक्षण देण्याचं आणि निदानात्मक साहित्य पुरवण्याचं काम संगवारीने केलं. त्याचबरोबर टीमच्या काही डॉक्टर मंडळींनी, शासकीय आरोग्य सेवेवरील कोविडमुळे आलेला ताण पाहून, कोविड-अतिदक्षता (ICU) विभागामधील २० खाटांची संपूर्ण जबाबदारी स्विकारली आहे. अशा ह्या संगवारी टीमचा भाग असल्याचा आनंद मनाला होतो. संगवारी टिम सोबतच मी प्रवास सुरु केलेला आहे, हा प्रवास लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी सातत्याने सुरु राहील, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

गावपातळीवरिल कोविड-19 प्रशिक्षण व निदानात्मक साहित्य वाटप

जितेन्द्र शहारे, गोंदिया (महाराष्ट्र)

7 Comments

  1. Rohit sonewane

    अति सुंदर काम करत आहत भाऊ आपण
    ज्या लोकांपर्यंत आरोग्यसेवेची सेवा पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी आपण जाऊन लोकांना आरोग्य सेवा देत आहात आणि ते ही अशा covid-19 च्या वेळेत आपण लोकांना फार मदत करत आहात आणि तेही अशा ठिकाणी जीत साधन नावाचे काहीही वस्तू नाही…….
    खरे वारियर तर आपण आहात
    असेच कार्य करत रहा आणि लोकांची मदत करत राहा..
    आपण आज हे सत्य केले की मानवच हा असा व्यक्ती आहे जो मानवाचा दुःख समजू शकतो

  2. संजय दरडमारे

    जितू सर आजपर्यंत आपण केलेले सामाजिक कार्य अतुलनीय आहे, आणि संगवारी नावाने घेतलेले एक नवीन समाजसुधारणेचे लक्ष्य ऊत्कृष्टरित्या पार पाडाल याचा विश्वास आहे,
    आणि संगवारीशी आम्ही नेहमीच सोबत आहो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *